इतिहासाचा मुआयना

share on:

वास्तविक इतिहास आणि इतिहासकारांनी लिहिलेला इतिहास ह्यात नेहमी फरक असतो. इतिहास लेखनात इतिहासकार काही गोष्टी जोडतात, काही सोडून देतात तर काही गोष्टींची निवड करतात आणि मग त्यालाच अमुक अमुक देशाचा इतिहास अशी संज्ञा दिली जाते. असा इतिहास वस्तुतः केवळ राजकीय शक्तीचा इतिहास असतो, जो मोठ्या प्रमाणात घडून आलेल्या हत्या आणि अपराधाच्या इतिहासापेक्षा वेगळा नसतो. चीनुआ अचिबीनं लिहिलंय कि “जोपर्यंत हरीण तिचा इतिहास स्वतः लिहिणार नाही तोपर्यंत हरणांच्या इतिहासात फक्त शिकाऱ्यांच्याच शौर्यगाथा गायल्या जातील”. म्हणूनच भारताच्या इतिहासात वैदिक संस्कृती उठून दिसते तर बौद्ध संस्कृती दबलेली आणि मूळनिवाश्यांचा इतिहास अधून मधून तुटल्यासारखा दिसतो.

इतिहासात नावापुढे “श्री” लावण्याची क्रेझ गुप्तकाळात दिसून येते. गुप्तकालीन राजांनी आपल्या नावापुढे सन्मानसूचक “श्री” लावल्याचे दिसून येते. त्यापूर्वीच्या इतिहासात “श्री” ची अशी क्रेझ दिसून येत नाही. अशात मग “श्रीमद्भागवत” चा रचनाकाळ हा गुप्तकालीन असण्याचीच दाट शक्यता आहे.

पाली भाषेत “तांबे” म्हणजे “लोखंड” किंवा “लोह”! ह्याचा अर्थ असा कि जेव्हा लोखंडाचा शोध लागला नव्हता तेव्हा लोक तांब्यालाच “ लोह” म्हणत. लोह पासूनच लोहित, लहू हे शब्द बनलेले आहेत. “ लोहित” चा अर्थ आहे लाल रंगाचा. परंतु, लोह तर लाल रंगाचे नसून काळ्या रंगाचे असते. लाल म्हणजे रक्तासारखा रंग तर तांब्याचा असतो. यावरून असा निष्कर्ष निघू शकतो कि पाली भाषा ही लोह म्हणजेच लोखंडाचा शोध लागण्याच्या आधीपासून अस्तित्वात आहे. म्हणूनच तर पाली भाषेत तांब्याचा एक अर्थ लोह असा देखील असल्याचा दिसून येतो.

स्वपन कुमार बिश्वास यांनी लिहिलेला इतिहास – ग्रंथ ” बौद्ध धर्म : मोहनजोदड़ो हड़प्पा नगरों का धर्म ” ह्याठिकाणी नमूद करावा वाटतो.सुमारे ४०० पानांचा हा ग्रंथ अनेक साहित्यिक आणि पुरातात्विक पुराव्यांच्या आधारे ही गोष्ट सिद्ध करतो कि सिंधू संस्कृती ही वास्तविक पाहता बौद्ध संस्कृती होती. ह्या पुस्तकात विस्ताराने प्रतिपादन केल्या गेलंय कि मोहेंजोदडो आणि हडप्पा या नगरांमध्ये बौद्ध स्तूप सापडले असून ते सर्व स्तूप हाडाप्पाकालीन आहेत. मोहेंजोदडो आणि हडप्पाच्या स्तुपांमध्ये वापरण्यात आलेल्या विटा, बांधकाम शैली, तिथे सापडलेली भांडी, त्या भांड्यांवरील चित्रकला, हे सर्वकाही हडप्पाकालीनच आहे. हाडाप्पाकालीन ह्यासाठी कि त्या बौद्ध स्तुपांच्या खाली इतर कोणतीही आधारभूत संरचना दिसून आलेली नाही कि ज्याआधारे असं म्हणता येईल कि हे स्तूप नंतर निर्माण केल्या गेले. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात बौद्ध स्तूप सापडले नसून बौद्ध स्तुपांच्याच उत्खननात सिंधू संस्कृती सापडली आहे, हे तर एक सर्वविदित सत्य आहे.

शिलालेखीय पुरावे तर स्पष्टपणे सांगतात कि गौतम बुद्धाच्या पूर्वीही अनेक बुद्ध होऊन गेलेत. सम्राट अशोकाचा निग्लीवा शिलालेख जरूर वाचा. ज्यात लिहिलंय कि आपल्या राज्याभिषेकाच्या १४ व्या वर्षी अशोकाने निग्लीवा येथे जाऊन कनकमुनी बुद्धाच्या स्तुपाचा आकार द्विगुणीत केला. कनकमुनी (कोनागमन) बुद्धाचा हा स्तूप, सम्राट अशोकाच्या कार्यकालाच्या कितीतरी आधी बनवण्यात आलेला आहे. गौतम बुद्ध आणि कनकमुनी बुद्ध हे दोघेही वेगवेगळे आहेत. कनकमुनी बुद्ध हे पहिले बुद्ध होत. इतिहासकार के.सी. श्रीवास्तव आपल्या , ” प्राचीन भारत का इतिहास और संस्कृति” ह्या पुस्तकात लिहितात कि भर्हुत चे लेख आणि पाली साहित्यात शाक्यमुनीच्या व्यतिरिक्तही अनेक बुद्धांचा उल्लेख मिळतो. फाहीयान सुद्धा म्हणतो कि त्याने कश्यप आणि कक्कुच्छंद बुद्धांचे स्मारक बघितले आहेत. जर अनेक बुद्ध असण्याची गोष्ट खोटी असेल तर मग अशोकाचे शिलालेख खरे कसे? फाहीयान चा वृतांत खरा कसा? भर्हुत चे लेख खरे कसे? आणि जर हे सगळं खोटं असेल तर मग तुम्ही सांगितलेला इतिहास खरा कसा काय ठरतो?

मूळ लेखक(हिंदी) : डॉ. राजेंद्र प्रसाद सिंह

मराठी अनुवाद: अविनाश दाभाडे

share on:

Leave a Response