ओशोचा सनातनी खेळ

share on:

(संजय जोठे ह्यांच्या मूळ हिंदी लेखावर आधारित)

  • मराठी अनुवाद : अविनाश दाभाडे

 

प्राचीन काळापासून बुद्धाचे ब्राह्मणीकरण करण्याचे कारस्थान भारतातील बुवा, महाराज, साधू, आचार्य वगैरे वगैरे विशेषणांनी अलंकृत मंडळी करत आली आहे. ह्या संदर्भात आधुनिक भारतात ओशो नामक अश्याच एका बाबाद्वारा रचले गेलेले कारस्थान खोलात जाऊन  बघणे आवश्यक आहे. ओशोने आपल्या वाक्चातुर्याने अकलेचे कितीही तारे तोडलेले असले तरीही ह्या देशातील तीन सर्वाधिक विषारी सिद्धांत त्याने कधीही नाकारलेले नाहीत; आत्मा, परमात्मा आणि पुनर्जन्म. उलटपक्षी ओशोने ज्या कुण्या  महापुरुषाला किंवा ग्रंथाला स्पर्श केला, त्याला त्याने ह्या विषाचे लेपण लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. अगदीच काय तर गौतम बुद्धासारख्या आत्मा, परमात्मा आणि पुनर्जन्म विरोधी व्यक्तीला देखील ओशोने पुनर्जन्माच्या बाजूने उभे करण्याचे भयंकर कारस्थान रचले आहे. ह्या दृष्टीने पाहता ओशो म्हणजे दुसऱ्यांदा बुद्धाचे ब्राह्मणीकरण करणारा आधुनिक आदि शंकराचार्यच होय.

ह्या ठिकाणी नमूद करावे वाटते कि मुळात एक अर्थशास्त्रज्ञ असूनदेखील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी, सामाजिक प्रश्नांचे मूळ जाणून समाजशास्त्रज्ञ, तत्ववेत्ता आदि भूमिकांत शिरून इथल्या जातिव्यवस्थेच्या धार्मिक आधारांना नेस्तनाबूत करण्याचा दृष्टीकोन ह्या देशाला दिला. बाबासाहेबांच्या ह्याच दृष्टीकोनातून ओशो सारख्यांच्या षड्यंत्राकडे बघणे आवश्यक आहे. स्वतः बाबासाहेबांनी ज्या बुद्धाला शोधून काढले त्याच बुद्धाची सर्वाधिक खतरनाक व्याख्या करत ओशो आणि त्याचे परलोकवादी, सनातनी संन्यासी फिरत आहेत आणि सोबतच बुद्धाच्या तोंडून शंकराचार्याची वाणी वदवत आहेत. खुद्द ओशोही आयुष्यभर हेच कुकर्म करत राहिला. आधुनिक भारतात राहुल सांकृत्यायन, आनंद कौसल्यायन, आंबेडकर,जे. कृष्णमुर्ती, आदींनी ज्याप्रकारे बुद्ध दर्शनशास्त्र प्रसारित केलं त्याने पुन्हा एकदा बुद्ध आपल्या श्रमण रुपात परत येतात कि काय अशी भीती इथल्या व्यवस्थेच्या मनात निर्माण झाली होती. ह्याच काळात युरोप आणि अमेरिकेतही बुद्ध विचारांचे आकर्षण वाढू लागले होते. दोन दोन विश्वयुद्ध आणि तदनंतरचा शितयुद्धकालीन तणाव, यांत अवघे पश्चिम जग एका नास्तिक, तर्कप्रधान आणि उच्च नैतिक मूल्यांचे अधिष्ठान असलेल्या धर्माच्या शोधात होते. ह्याच काळात  भारतातील पोंगापंडित, संन्यासी, लेखक. योगी, ज्योतिषी जेव्हा युरोप अमेरिकेत जात तेव्हा त्यांना तिथे नव्याने उभारून येत असलेल्या बुद्धाचा सामना करावा लागे आणि इकडे भारतात आल्यावर आंबेडकर आणि जे.कृष्ण्मुर्तींनी  विकसित केलेल्या बुद्धाशी त्यांची गाठ असे. अश्याप्रकारे दोन्ही बाजूंनी कोंडमारा झाल्याने त्या पोंगापंडितांनी आदि शंकराचार्याच्या शैलीने बुद्धाचा काटा काढण्यासाठी षड्यंत्रे रचायला सुरुवात केली. आणि अश्या प्रकारे ह्या खेळात ओशोचा प्रवेश होतो आणि मग तो भारतात वेदांताचे आणि पश्चिमेत क्रांतीचे धडे द्यायला सुरुवात करून पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडून उदय होत असलेल्या बुद्धाला परमात्मा आणि पुनर्जन्माचे इंजेक्शन देतो. शेवटी शेवटी तर ओशो हे देखील म्हणतो कि बुद्धाचा आत्मा ओशोच्या शरीरात आलाय आणि तो प्रवचन देऊ पाहतोय.

आपल्या शरीरात बुद्ध शिरल्याच खूपच नाट्यमय वर्णन ओशो करतो आणि आपल्या वाक्चातुर्याच उत्कृष्ट सादरीकरण करत, बुद्धाची महानता मान्य करून स्वतःला बुद्धापेक्षाही श्रेष्ठ आणि समकालीन जगाचा एकमेव तारणहार असल्याचा आव आणतो. आपल्या वर्णनात ओशो सतत म्हणतो कि बुद्ध स्वतः ओशोच्या शरीरात प्रवेश करू इच्छितात परंतु ओशो त्यांना म्हणतो कि आपण आता जुने झाला आहात  आणि आपणास  ह्या नवीन जगाच ज्ञान नाही. ओशो पुढे म्हणतो कि त्याने बुद्धाला ह्या अटीवर त्याच्या शरीरात प्रवेश करू दिलाय कि जेव्हा कधी बुद्ध आणि त्याच्या दरम्यान काही वाद होतील तेव्हा बुद्धाला आपले चंबूगबाळ  घेऊन परत जावं लागेल. ओशो पुढे म्हणतो कि ही गोष्ट बुद्धाच्या लगेच लक्षात आली आणि ओशोच्या अटींच्या अधीन राहून त्याच्या शरीरात राहून संदेश द्यायला बुद्ध तयार झाले. ही गोष्ट सांगताक्षणीच ओशो आपल्या चतुराईचा एक तीक्ष्ण बाण सोडतो आणि म्हणतो कि बुद्धाला ही गोष्ट लगेच कळाली कारण बुद्धाची प्रज्ञा अजूनही शाबूत आहे. इथे ओशोचा खरा खेळ आहे, फक्त दोन वाक्यांपुर्वीच तो म्हणतो कि बुद्ध आता जुने आणि आउटडेटेड झाले आहेत परंतु लागलीच बुद्धाला आपला सहकारी सिद्ध करून त्यांची प्रज्ञा अजूनही जागृत असल्याचे नमूद करतो. ब्राह्मणवादी षड्यंत्राचा हा एक अद्भुत नमुना होय. हे वर्णन ओशोने २८ जानेवारी १९८८ ला केलं आणि लगेच स्वतःच नामकरण भगवान ऐवजी” मैत्रेय बुद्ध” असं करून टाकलं. त्यानंतर दोन दिवसांनी ओशो मोठ्या चतुराईन  असं जाहीर करून टाकतो  कि बुद्ध त्यांच्या जुन्याच विचारावर चालू इच्छितात आणि म्हणून त्याने त्यांच्या चंबू गबाळा सहित त्यांना निरोप देऊन टाकला.

ओशोने वर्णन केलेल्या ह्या काल्पनिक घटनाक्रमातून त्यामागील कुत्सित चालबाजी ओळखणे आवश्यक आहे. आदिशांकाराचार्या नंतर तो बुद्धाला एक सनातनी पंडित बनवण्याचा आतापर्यंतचा दुसरा मोठा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. परंतु, ओशोला इतिहास माहिती आहे आणि पश्चिमेकडून विचारल्या जाणाऱ्या तार्किक प्रश्नांचीही त्याला जाण आहे. म्हणूनच तर तो बुद्धाला विष्णूचा अवतार न म्हणता स्वतःलाच बुद्धाचा अवतार घोषित करतो. आजच्या जगात विष्णूचं मिथक पुन्हा उभं करणं कठीण आहे पण पुनर्जन्माच्या संकल्पनेतून एक छोटीसी पाऊलवाट निघते जीच्याआधारे आधारे असं प्रसारित केलं जाऊ शकतं कि बुद्धच ओशोच्या तोंडून बोलतो आहे. यातून दोन गोष्टी साध्य होतात एक म्हणजे ओशोने आयुष्यभर केलेल्या  पोपटपंची ला वैधता प्राप्त होते आणि दुसरे असे कि बुद्धाचा भाष्यकार बनून बुद्ध आणि बुद्ध परंपरेची दिशा ठरवण्याचा अधिकार तो स्वतःकडे घेऊन बसतो. पुढे तो आणखी एक डाव टाकतो, तो असा कि चार दिवसानंतर ओशो बुद्धाला आउटडेटेड घोषित करून बाहेरचा रस्ता दाखवल्याचा दावा करतो आणि स्वतःला एक अपडेटेड बुद्ध घोषित करून स्वतःचं नाव मैत्रेय बुद्धावरून ओशो असं बदलवून टाकतो. तद्नंतर ओशो “ द झेन मेनिफेस्टो” ह्या आपल्या शेवटच्या  पुस्तकात परमात्मा आणि पुनर्जन्म हेच अंतिम सत्य असल्याचं प्रतिपादन करतो.

अश्याप्रकारे नाव बदलवून कुणाला कुणाचातरी अवतार घोषित करणे, ही भारतातील ब्राह्मणवादाची यशस्वी कार्यपद्धती राहिलेली आहे. हीच कार्यपद्धती ओशोचे सांप्रत शिष्य अवलंब करीत आहेत. हरियानातील सोनीपत येथे ओशोचा एक आश्रम आहे आणि तेथील मुख्य गुरूने असा दावा केलाय कि मरताक्षणीच ओशोने सूक्ष्म रुपात त्याच्या समोर प्रगट होऊन त्याला ओशोचा उत्तराधिकारी बनवलं होतं. आजकाल ओशोचा हा उत्तराधिकारी चौऱ्यांशी दिवसांत चौऱ्यांशी लक्ष योन्यांतून मुक्ती मिळवून देण्याचा दावा करतोय. ओशो जे विषारी झाड लाऊन गेला त्याला अश्याप्रकारे फांद्या फुटत आहेत. विशेष म्हणजे ह्या सगळ्या सनातनी लीला तुमच्या आमच्या नाकावर टिच्चून राजरोसपणे चालू आहेत.

त्यामुळे आता आवश्यक आहे कि मार्क्सला मानणाऱ्यांनी आंबेडकरही खोलात जाऊन समजून घ्यावा आणि आंबेडकरवाद्यांनीही मार्क्सला जाणावे, तेव्हा कुठे तुम्हा आम्हाला ह्या सनातनी षड्यंत्राचा सामना करता येईल. आंबेडकर हा उर्वरित जगातून भारतात येण्याचा आणि भारतातून उर्वरित जगात शिरण्याचा एक अनिवार्य थांबा आहे. आंबेडकरांकडे आपल्याला ह्याच रुपात पाहावे लागेल तेव्हाच कुठे आपल्याला जगभरात झालेल्या क्रांत्यांमध्ये भारतीय बहुजन, दलित, आदिवासी आणि स्त्रियांच्या मुक्तीचा काहीतरी उपाय सापडेल. जर आम्ही आंबेडकरांना समजून घेतले नाही , तर सनातन्यांच्या परमात्मा आणि पुनर्जन्माच्या खोल खाईत आम्हाला असेच खितपत पडून राहावे लागेल हे मात्र नक्की!

share on:

Leave a Response