नीति आणि धम्म

share on:

लेखक: सतीश बनसोडे

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पथप्रदर्शक पुस्तकात ज्याप्रमाणे धम्म आणि धर्माचा फरक उलगडवून दाखवला आहे. त्याच प्रमाणे नीती चर्चेलाही धर्माच्या बंधनातून सोडवलेले आहे. म्हणजे धर्मात अडकलेला धम्म व धर्मात अडकलेली नीती यांना वेगळे करण्याचे काम 'बुध्द आणि त्यांचा धम्म' या पुस्तकाने केलेले आहे. चतुर्थ खंड भाग पहिला मध्ये नीती आणि धर्म, धम्म आणि नीती व केवळ नीती पुरेशी नाही ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. या स्वतंत्र उपशीर्षकांमध्ये बाबासाहेब नीतीची चर्चा करतात.जी की स्वयंस्पष्ट आहे.

मानवी समुहाला नीतीची आवश्यकता का भासली असावी किंवा नीतीचा उगम का झाला असावा? या प्रश्नांचा वेध बाबासाहेब सर्वप्रथम घेतात. डार्विनचा उत्क्रांतीचा सिध्दांत 'Struggle for Existence' या आधारे बाबासाहेब म्हणतात.

"हे सर्वश्रुतच आहे की, मानव समाजाचा विकास जीवन संघर्षामुळे घडला. (It is common knowledge that evolution takes place through a struggle for existence) आणि हा जीवनसंघर्ष का घडला तर प्रारंभिक काळात अन्नसामुग्री अति-मर्यादीत होती. हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरुपाचा होता. त्यामुळेच निसर्गाचे दात आणि नखे रक्तलांछीत आहेत",  या प्रारंभीच्या रक्तरंजित अवस्थेत फक्त योग्यतम जगू शकत होता. (Survival of the Fittest.)(IV:I:7:9,10,11)

तृतीय खंडात बाबासाहेब सद्धम्माच्या अनुषंगाने  जीवन संघर्षाची(Struggle for Existence) चर्चा करतात. त्यात ते म्हणतात, "जन्माने माणसे विषम असतात, काही बळकट तर काही दुबळी असतात... या जीवनसंघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे, असे मानले तर दुबळयांची स्थिती असहाय्य होईल".(III:5:घ:3:1,2,3...7) यानंतर बाबासाहेब प्रश्न विचारतात," विषमता जीवनाचा नियम करुन चालेल काय? संघर्षात जे योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय?" (III:5:घ:3:8,10,)["Should this rule of inequality be allowed to be the rule of life?... Is the fittest is best from the point of view of society?"]

आणि या प्रश्नाचे बाबासाहेब उत्तर देतात.  "समाजाला कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतमाची आहे, योग्यतमाची नव्हे". ["What society wants is the best and not the fittest"] (III:5:घ:3:13)

[आधुनिक जगातील श्रेष्ठतम (best) व्यक्ती स्टीफन हॉकींग रुढार्थाने योग्यतम (fittest) नव्हे.]

जीवन कलहात आणि जीवन संघर्षात शक्तीमान माणसे टिकत असतील तर "जी 'best' आहेत परंतु दुर्बल आहेत त्यांचे काय?" अशा कमजोर माणसांचं संरक्षण करण्याचा मार्ग कोणता? बाबासाहेब म्हणतात, "शक्तीमानांवर निर्बंध घालून" दुर्बलांचे संरक्षण करता येईल. येथेच बाबासाहेब नीतीची आवश्यकता व उगम पाहतात आणि नीतीचे पालन व्हावे यासाठी तीला पवित्रता बहाल करण्यात आलेली आहे असे प्रतिपादन करतात. आणखी दोन कारणांची चर्चा बाबासाहेब करतात. ज्यामुळे नीती पवित्र मानण्यात येते.

  • समाजसंघटन मजबुत होण्यासाठी, त्यातील संघर्ष टाळण्यासाठी एकसमान मापदंड आवश्यक आहे.
  • व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी.

जीवन संघर्षात अथवा समुह शासनात व्यक्तीचे हित सुरक्षीत नसते. व्यक्तीहितासाठी बंधुतेला universally effective बनविणे (सार्वकालिक प्रभावी शक्ती बनविणे) हा त्यावरचा उपाय आहे. मग बंधुता म्हणजे काय? तर मानवा-मानवातील भातृभाव म्हणजेच बंधुता, नीती म्हणजे बंधुता असेल. तर धम्माचे दुसरे नाव बंधुता होते. बाबासाहेब बंधुतेलाही पावित्र्य बहाल करतात.

 

एका माणसाने दुसऱ्या माणसाबरोबर नीतीने वागायचे ते स्वहितासाठी/सामाजिक हितासाठी. देवाची जागा धम्मात नीतीने पटकावलेली आहे. म्हणजेच धर्मात नीतीला स्थान नाही तर तो एक जोडलेला डबा आहे. याउलट धम्म म्हणजे नीती, धम्माचे सार नीती आहे आणि त्यासाठी माणसाने माणसावर प्रेम करणे आवश्यक आहे. माणूस आणि माणसाचे, माणसाशी या जगातील नाते हा बुध्दाच्या धम्माचा केंद्रबिंदु आहे. माणसाचे माणसाबरोबरचे नाते हे धम्माचे अधिष्ठान आहे. माणसाचे माणसाबरोबरचे नाते हे अनेक बाबींनी बाधित होते. जात, धर्म, पैसा, वंश सामाजिक प्रतिष्ठा, कपडे, पद इ. यासारखे घटक मानवा-मानवाच्या नात्यात अडथळा आणत असतात. या घटकांचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी माणसा-माणसात प्रेम वृध्दींगत करणे आवश्यक आहे. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात "धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे. यातून नीतीचा उगम होतो". पुढे ते लिहितात- "देवाला संतुष्ट करण्यासाठी माणसाने नीतीमान व्हायचे नाही तर 'स्वहितासाठीच' माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे."

या ठिकाणी बाबासाहेब 'स्वहितासाठी' नीतीने वागण्याचे प्रतिपादन करतात. परंतु पुढच्याच उपशीर्षकात ते नीतीला पवित्र करुन सर्वव्यापक असली पाहिजे असे लिहितात व तीला सामाजिक बनवतात. समाजहितासाठी 'best' चे दुर्बलांचे संरक्षण करण्यासाठी नीतीचे पालन करण्याचे सूचवतात आणि स्वत:च प्रश्न उपस्थित करतात की, सामाजिक रुप धारण केल्याने नीती असामाजिक तर होत नाही ना? या ठिकाणी नीती समाजहित विरोधी कशी बनते याची चर्चा बाबासाहेब करतात. चोर-दरोडेखोरांमध्ये व्यापा-यामध्येही नीती असते. परंतु ती नीती त्या समुहाला 'वेगळेपणाची जाणीव' आणि 'क्रियाशीलता' देते. त्या विशिष्ट समुहाचे संरक्षण करण्यापुरतीच ती मर्यादीत असते. अशा प्रसंगी नीती समाजहित विरोधीनी म्हणून कार्य करते.

परंतु जेव्हा संपूर्ण समाजाला ती सारखेच आदर्श व मापदंड देते. जेव्हा ती सर्वव्यापक (Universal) होते तेव्हा ती संपूर्ण समाजाच्या हिताची होते. या ठिकाणी बाबासाहेब 'समाजहित' 'स्वहित' यातील व्दंव्द मोडून टाकतात. समाजहितामध्येच व्यक्तीहीत आहे असे सूचवतात. ते म्हणतात, "तिस-या एका कारणास्तव नीती 'पवित्र' आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी".

आधुनिक जगातील तत्ववेत्ते बर्ट्रांड रसेल यांनी याच मुद्याकडे लक्ष वेधलेले आहे. ते म्हणतात, "मानवातील दोन भिन्न घटकांना आपण स्वतंत्र स्थान दिले पाहिजे. पहिला सामाजिक आणि दुसरा वैयक्तिक. जे नीतीशास्त्र या दोहोपैकी फक्त एकाचा अगर दुस-याचा विचार करते ते अपूर्ण आणि असमाधानकारक असते". [Human Society in Ethics & Politics पृ.17]

बाबासाहेबांनी नीतीशास्त्रातील ही दुही दूर करण्यासाठी नीतीला पावित्र्य देवून ती सामाजिक व सर्वव्यापक केली आहे. स्वहितआणि सामाजिकहीत दोहोंचे अस्तित्व आपल्याला धम्माच्या मांडणीत दिसते. 'The Best Man' या उपशीर्षात बाबासाहेब सर्वोत्तम माणूस कोण? या बुध्दाच्या प्रवचनाची चर्चा करतात. "जो स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो  तो सर्वांत उत्तम माणूस आहे," असे ते म्हणतात.                                ["Who has striven both for his own welfare and for that of others.... this is best and chief, topmost and highest and supreme."] (IV:4:3:6)

[जो स्वहित पाहातो त्याचबरोबर समाजहितही. Enlightened Self- Interest अर्थात प्रबोधित स्वहित ]

"बुध्द आणि त्यांचा धम्म" हा अनन्य असा ग्रंथ बुध्दाच्या चरित्राचा व धम्माचा पट आपल्याला उलगडवून दाखवणारा ग्रंथ आहे. बाबासाहेबांनी यामध्ये बुध्दाच्या आदर्श अशा तत्वांची मांडणी कालानुरुप करुन भावी पिढीसाठी दीपस्तंभ उभा केलेला आहे. नीतीच्या अनुषंगाने बाबासाहेब आदर्श तत्वे, त्यांचे मापदंड व हे सर्वत्र प्रत्यक्षात उतरण्यासाठी काय केले पाहिजे याचीही मांडणी करतात. पंचशीलाची मांडणी करताना बाबासाहेब लिहितात- प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापण असले पाहिजे की, ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करु शकेल. माझ्यामते पंचशील माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे. आदर्शाचे महत्व अधोरेखीत करताना बाबासाहेब पुढे लिहितात- जगात सर्वत्र पतित लोक असतात. परंतु पतितांचे दोन वर्ग असतात. ज्यांच्या समोर काही आदर्श आहे असे पतित आणि ज्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही असे पतित. पुढे बाबासाहेब अधोरेखीत करतात की, महत्वाची गोष्ट माणसाचा अध:पात ही नसून त्या अवस्थेत मुक्त होण्याच्या "आदर्शांचा अभाव" हीच होय.

"आदर्शाच्या अभावाला" बाबासाहेबांनी या ठिकाणी महत्व दिलेले आपणाला दिसून येते. जीवनातील आदर्श तत्वे स्वीकारण्याच्या बाबतीत बाबासाहेब निकष देतात- "ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय? ती सामाजिक हित साधणारी आहेत काय?"

"बुध्द आणि त्यांच्या धम्माची" रचना करत असतानाच बाबासाहेब मानवतावादी क्रांतीचे नेतृत्व करत होते. त्या क्रांतीला बौध्दिक आधार पुरवण्यासाठी विचारांची मांडणी करत होते. मानवाच्या मुक्तीसाठी जगाच्या पुनर्रचनेचे ध्येय समोर ठेवून काम करणारी विचारधारा उभी करत होते. याच सुमारास जगात "प्रश्न आहे जग बदलण्याचा", असा सवाल घेऊन साम्यवादी विचारधारा शोषणमुक्तीसाठीसाठी आघाडीवर होती. जगाला शोषणमुक्त करुन मानवतेची पहाट उगवण्याच्या आत या विचारधारेला हुकुमशाहीकडे वळावे लागले. लोकशाही ऐवजी हुकुमशाहीकडे साम्यवादाची वाटचाल का झाली? डॉ. आनंद तेलतुंबडेंनी बुध्द विचार मार्क्सवादी दृष्टीक्षेप या लेख संग्रहांच्या प्रस्तावनेत विधान केले, ' शतकाच्या आत मानवी मुक्तिचा मार्ग असलेल्या मार्क्सवादाला अमानवी तानाशाही करुन सोडले."  कारण नीतीचा अभाव म्हणजेच बंधुतेचा अभाव म्हणजेच लोकशाहीला तिलांजली.

नवीन जगाची निर्मिती करत असताना जुन्या जखडबंद व्यवस्थेला उध्वस्त करत असताना नवमानवाला वर्तनासाठी नीतीची आवश्यकता आहे. तो ईश्वर, कर्मविपाक, आत्मा,कर्मकांड टाकून देणार आहे.आधुनिक जीवनमूल्ये, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता तो स्वीकारणार आहे. विज्ञानाचा उदय माणसाला दैववादातुन मुक्ती देईल त्याचबरोबर बुद्धिवादच बळकटीकरण करील . अशा परिस्थितीत मानव समाजाला एकसंघ ठेवणारी शक्ती नीती हीच असणार आहे, म्हणूनच बाबासाहेब नीतीला पवित्रता देतात व तिला सामाजिक करतात. जागतिकीकरण नवीन नीतीशास्त्र जरी मांडू इच्छित असलं तरी मानवा-मानवाचे संबंध हाच त्याचा पाया असणार आहे.

 

टिपा व संदर्भ :-

1) बुद्ध आणि त्यांचा धम्म –डॉ.बाबासाहेब आंबेडकर,प्रकाशन आवृत्ती, 1997

अनुवाद- म भि चिटणीस,तळवटकर,रेगे  :- तृतीय(III:5:घ:3:1,2,3...7..910),

चतुर्थ खंड (IV:1: 5,6,7)  खंड

2) Human Society in  Ethics & Politics – Bartrand Russel-page-17

3) बुद्धविचार मार्क्सवादी दृष्टिक्षेप लेख संग्रह, लोकवाडमय प्रकाशन -2011 प्रस्तावना डॉ.आनंद तेलतुंबडे –पान क्र.पंधरा,सोळा.-"बुध्द नेहमीच चांगली कामे करण्याचा पुरस्कर्ता होता.'मुद्दा आहे तो जग बदलण्याचा' म्हणणारा मार्क्स तर कृतीला अत्यावश्यक मानायचा.कृतीवरील हा भर स्वाभाविकपणे नीतिमत्तेचा प्रश्न उपस्थित करतो.कारण नीतिमत्ता कृतीला चौकट देते.मार्क्सने आपल्या शेवट शेवटच्या लिखाणात काही ठिकाणी स्वयंसिध्द(absolute) नीतिमत्तेला नकार दिला होता.मार्क्सला या स्वयंसिध्द नीतिमत्तेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता,याचा अभ्यास व्हायला हवा.पण प्रत्यक्षात मार्क्सवाद्यांनी त्याचा 'अतर्ह नीतिमत्ता' असा अर्थ घेतला आणि कृतीला 'नीतिमत्ताहीन कृती ' केले. त्यामुळे फार अनर्थ झाला आहे.बौध्द धर्मात विनय,शील यांच्या चौकटीने त्यातील मानवतावादी आशय डागाळू दिला नाही. मात्र मार्क्सवादी कृतीने शतकाच्या आत मानवी मुक्तिचा मार्ग असलेल्या मार्क्सवादाला अमानवी तानाशाही करुन सोडले.

 

share on:

Leave a Response