रानडे,गांधी आणि जीना : कालातीत भाष्य

share on:

न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या 101 व्या जन्मदिनानिमित्त बाबासाहेबांनी गोखले मेमोरिअल हॉल,  पुणे येंथे  दिलेले भाष्‍ण हे अनेक अर्थाने कालातीत आहे खरेतर प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांनी स्वत:च या भाषणाला प्रासंगीक ठरवले आहे.परंतु प्रस्तावनेमध्येच बाबासाहेब म्हणतात “ त्यांच्या काही मित्रांना या भाषणात काही कायमस्वरुपाचे मुल्य जाणवले व त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी ते छापण्यास संमती दिली.” बाबासाहेबांनी न्या.रानडे च्या शतकोत्तर जयंतीच्या निमित्ताने त्यांनी घेतलेल्या भूमिकेची पाठराखण केलेली आहे परंतु असे करत असताना न्या.रानडेंबरोबरचे मतभेदही त्यांनी व्यक्त केलेले आहेत.  त्याचबरोबर त्यांच्या मर्यादाही त्यांनी अधोरेखीत केलेल्या आहेत.

बाबासाहेबांनी भारतातील सुधारणावादी प्रवाहाचे नेतृत्व करणा-या न्या.रानडे यांच्या विचार व कार्यप्रणालीचा आढावा घेताना त्यांच्या कर्तृत्वाला  अनेक कसोटयांवर जोखतांना अनेक पाश्चात्य विचारवंत व  तत्ववेत्ते यांना दिमतीला घेत आपली भूमिका ठोसपणे मांडली आहे. खरेतर न्या.रानडेंच्या निमित्ताने बाबासाहेबांनी स्वत:च्याच भुमिकांना ठाशीव आकार दिलेला आहे. इतिहास घडणीतील माणसांचे स्थान ,महामानव कोणाला म्हणावे ,संघटना,लोकशाही, विचारांचे अमरत्व या मुददयाना घेवून बाबासाहेब सखोल चिंतन करताना आपणाला दिसतात. समाजाचा –हास, तत्वज्ञान, सामाजिक पुर्नरचना ,हिंदुधर्म व हिंदु तत्वज्ञान ,समाजपध्दती, यांची उपयोगिता (Uitlity) आणि न्याय  (Justice ) या कसोटयांच्या आधारे बाबासाहेब समिक्षा करताना आपणाला दिसतात. सुधारणावादी प्रवाहाचे महत्व प्रतिपादन करताना त्यांचा आता अंत घडावा महणजे नविन क्रांतीकारी प्रवाह गतिमान होईल असा विश्वास शेवटी बाबासाहेब व्यक्त करतात खरेतर बाबासाहेबांच्या रुपाने क्रांतीकारी प्रवाह यापूर्वीच (1916 लाच) गतिमान झालेला होता.

रानडे ,गांधी आणि जिना या भाषणाच्या संदर्भ बहुतांश: वेळा नायकपुजेच्या अनुषंगाने येतो.भारतात नायकपुजेचे ,मुर्तीपुजेचे आधिक्य आहे. आजही तो त्यातून सुटलेला नाही. आता तर सोशल मिडिया एकंदरीच मुद्रीत आणि इलेक्ट्रानिक माध्यमांनी लोकांना आपल्या तालावर नाचायलाच नाही तर विचार करायला लावले आहे. किंवा विचारच करु नये अशी स्थिती निर्माण केलेली आहे. त्यामुळे आजही नायकपुजेतून भारताची सुटका नाही ! ती नायकपुजा जशी राजकारणात (उदा. नरेंद्र मोदी ) दिसते तशी खेळात (उदा.सचिन तेंडुलकर) चित्रपटात (उदा.अमिताभ बच्चन) अगदी लुटुपुटुच्या समाजकारणात (उदा.अण्णा हजारे ) आपणाला दिसते.नायकपुजेच्या अनुषंगाने बाबासाहेबांनी  भारतीय मानसिकता उघडी करुन तिला धोक्याचा इशारा दिलेला आहे. “ व्यक्तीपेक्षा देश मोठा असतो हे माझ्या देशबांधवाना  एक दिवस कळून  येईल अशी मला आशा वाटते. कारण देशसेवा आणि गांधी व जिनांची पुजा या भिन्न बाबी आहेत.”

इतिहास कोण घडवतो ?

थोर माणसे इतिहास घडवतात काय ?असा प्रश्न उपस्थित करुन बाबासाहेब माणुस हा काळाचे अपत्य असतो या विधानाला चुक ठरवतात. या संदर्भात बाबासाहेब तीन विचारवंताच्या मतांचा आढावा घेतात व त्यांच्या मर्यादा दाखवतात ती तीन मते अशी आहेत.

1) ऑगस्टाईन – यांच्या मते इतिहास म्हणजे ईश्वराने रचून ठेवलेल्या योजनेचा उलडा आहे.

2) बकल- यांच्या मते इतिहास म्हण्जे भुगोल व भौतिकशास्त्र (भौगोलिक परिस्थिती).

3) कार्ल मार्क्स  – यांच्या मते इतिहास म्हणजे आर्थिक शक्तीची प्रतिक्रिया

या तीनही  मतांवर प्रतिक्रया देताना बाबसाहेब म्हणतात दैववाद्या शिवाय ऑगस्टाईन यांचे मत कोणीही स्वीकारणार नाही. तर बकल व मार्क्स यांच्या बाबतीत सांगायचे तर त्यांच्या म्हणण्यात सत्य  असले तरी त्यांच्या उपपत्ती पूर्ण सत्याचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. व्यक्तीनिरपेक्ष शक्ती (economic forces &  environmental forces) महत्त्वाच्या आहेतच पंरतु त्यांचा प्रभाव हा मानवी कर्तृत्वावरच अवलंबून असतो. यासाठी बाबासाहेब अतिशय महत्वाचे असे तीन उदाहरणे देतात. गारगोटी सर्व ठिकाणी आढळत नाही. तथापि जेथे ती आढळते तेथे गारगोटीवर गारगोटी ठोकून अग्नी तयार करण्यासाठी माणसाची  गरज भासते. असेच उदाहरण ते बी-बियाणें - शेती, धातु-यंत्र, शस्त्रे आणि त्यातून माणसाच्या सभ्यतेंचा आणि संस्कृतीचा झालेला उदय या संदर्भात देवून शेती करण्यासाठी व धातु पासून शस्त्रे व यंत्रे तयार करण्यासाठी माणसांचीच आवश्यकता लागत असते  असे प्रतिपादन करतात.यानंतर बाबासाहेब (social forces ) (सामाजिक शक्ती) या मुददयांसाठी थायर या थिओडोर रुझवेल्टच्या चरित्रकाराचा परिच्छेद देवून प्रत्येक पक्ष, पंथ, वा संस्थेला कशी कुंठीतावस्था प्राप्त होते, त्या कशा भुतकाळावर जगत असतात (उदा. भारतात सोन्याचा धुर निघत होता, भारतात विमाने बनविली जात होती ) याचे वर्णन करतात पुढे ते म्हणतात प्रत्येक समाजाला –हास आणि विनाशाला सामोरे जावे लागते.जुने मार्ग, जुन्या श्रध्दा आणि जुने आदर्श समाजाला उचलून धरण्यास व त्याला मार्गदर्शन करण्यास अयशस्वी ठरतात. नविन आदर्श सापडल्याशिवाय अशा समाजाच्या जगण्याची शक्यताच उरत नाही. या ठिकाणी बाबासाहेब कार्लाइलला उदधृत करतात “ बिकट काळ आला तरी त्यात सर्वनाश होतोच असे नाही अशा काळाला जर एक अत्यंत श्रेष्ठ बुध्दिमान ,दुरदर्शी, काळाची गरज ओळखून सत्याची पारख करणारा ,दुर्दम्य काळातही मुक्तीचा मार्ग जाणणारा व शौर्याने इतरांना त्या मार्गावर नेणारा महामानव  लाभला तर सर्वनाशापासून तो समाजाला वाचवू शकतो.”

जे लोक इतिहासाच्या घडणीत माणसाचे स्थान नाकारतात त्यांना हे उत्तर पुरेसे निर्णायक आहे असे बाबासाहेबांचे मत आहे. नविन मार्गाच्या शोधाव्दारे संकटमय प्रसंगाला समर्थपणे तोंड दिले जावू शकते.जेथे असा नवा मार्ग सापडत नाही तो समाज विनाश पावतो.काळही असा नविन मार्ग सुचवु शकतो परंतु योग्य मार्गावर पाऊल टाकण्याचे कार्य काळाचे नव्हे ते माणसाचे कार्य आहे असे नमुद करुन बाबासाहेब पुढे निष्कर्ष मांडतात “इतिहास घडविण्यास माणुस हाही एक घटक असून  परिस्थितीजन्य शक्तीला(environmental forces) (व्यक्तीनिरपेक्ष / सामाजिक शक्तिला) पहिले स्थान द्यावयाचे असेल तर देता येईल पण संपूर्ण कर्तृत्व मात्र तिला देता येणार नाही.”

महामानव कुणाला म्हणता येईल ?

अलेक्झांडर ,अत्तिला, सीझर , तैमुरलंग इ. सैनिकी योद्ध्यांची नावे उदधृत करुन बाबासाहेब म्हणतात त्यांचा इतिहासावरील चिरकालीन  प्रभाव /परिणाम फारच लहान प्रमाणात असतो त्याचप्रमाणे समाजाची पुर्नरचना करण्यासाठी किंवा त्याला धार चढविण्यासाठी कसलेही रसायन ते तयार करित नाहीत त्यानंतर बाबासाहेब महामानवांची श्चात्य विचारवंताच्या आधारे करतात. सैनिक योद्ध्या व्यतिरिक्त इतर महामानवांचे  मोजमाप करण्यासाठी काही कसोटयांची गरज असते. सर्व प्रथम कार्लाईल सत्यनिष्ठा (Sincerity ) ही कसोटी वापरतो. सत्य हाच महामानवांचा  पाया आहे. परंतु ती सत्यनिष्ठा म्हणजे स्वत:ला सत्यनिष्ठ समजणारी सत्यनिष्ठा  नव्हे असे कार्लाईल बजावतो. यानंतर लॉर्ड रोजबरी यांनी नेपालियनच्या अनुषंगाने वापरलेली दुसरी कसोटी नैतिक सदगुण व बौध्दीक उच्च्‍ गुणांचा समन्वय असणे म्हणजे महामानव  होय याची चर्चा बाबासाहेब करतात. व पुढे तिसरी कसोटी जी तत्ववेत्यांनी किंवा दैववाद्यानी सुचविलेली आहे ती देतात ,लॉर्ड रोजबेरीनेच तिचे सार दिलेले आहे ते असे “महामानव  या जगामध्ये एका फार मोठया नैसर्गिक किंवा निर्सगाच्या पलिकडील शक्तीच्या रुपात अवतीर्ण होतो. तो दैवी प्रशासक म्हणुन समाजाचे शुध्दीकरण करुन त्याला योग्य मार्गावर नेण्याच्या महान कार्यात तो व्यग्र असतो हे कार्य काहीसे विधायक व मुख्यत: अभावात्मक असले तरी ते समाज पुर्नघटनेशीच संबंधीत असते या तीनही कसोटयांची चर्चा करुन बाबासाहेब त्यांना अपूर्ण ठरवतात आणि आपल्याला दुस-याच एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेवून जातात तो म्हणजे थोर व्यक्ती (Great Man) आणि प्रसिध्द व्यक्ती (Eminant Man) यात काय फरक आहे ?  कार्लाईल,रोजबरी व तत्ववेत्ते /दैववादी यांच्या कसेाटयांची एकत्रित चर्चा बाबासाहेब करतात. सत्यनिष्ठा ,बुध्दी, आणि नैतिक सदगुण यातून प्रसिध्द व्यक्ती वेगळा होतो. परंतु समाजबदलासाठी जो प्रत्यक्ष कृती करतो ,जनतेला त्यासाठी प्रेरीत करतो तो थोर व्यक्ती बनतो (great man)(scanvenger of the society)

 रानडे महामानव  होते काय?  या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देवून बाबासाहेब त्यासाठी त्यांनी घेतलेल्या समाजसुधारणेच्या भुमिकेकडे निर्देश करतात.मराठा राज्य लयास जाण्यास किंवा भारतात ब्रिटीशांच्या विजयाची कारणे काय  ? यावर हिंदु समाजरचनेतील दोष हा मुख्य घटक असल्याचे रानडे निदान करतात व तो काढून टाकणे हे त्यांचे जीवीत कार्य बनवतात असे बाबासाहेबांचे प्रतिपादन आहे. परंतु या कामी त्यांना  विरोध कोणी केला? विरोध करणार कोणते आदर्श प्रत्यक्षात आणु ईच्छीत होते ? यावर बाबासाहेब म्हणतात टिळक व चिपळुणकर प्रवाहाने रानडेंना विरोध केला व हिंदु धार्मिक आदर्श ते प्रत्यक्षात आणु इच्छित होते की, ज्यामध्ये रानडे दुरुस्ती सुचवत होते. परंतु दुरुस्तीच्या पलीकडे बाबसाहेब या आदर्शावरच हल्ला चढवतात व मत मांडतात की हे आदर्शच वाईट आहेत. त्यासाठी ते सामाजिक उपयुक्तता सामाजिक न्याय या  दोन कसोटया वापरतात. आणि हिंदुधर्मपध्दती व हिंदुसमाजपध्दतीची चिकित्सा मांडतात. हिंदु समाजरचनेच्या आदर्शामुळे (चातुर्वर्ण्यपध्दती ,जातीव्यवस्था) लोकांच्या नीतीमत्तेवर वाईट व  हानीकारक परिणाम झालेला आहे.तत्व आणि स्वरुपाच्या दृष्टीने हिंदु आदर्श नित्शेच्या आदर्शासारखे आहेत मनु नित्शेपूर्वी जन्माला आला व त्याने ज्या तत्वज्ञानाला जन्म  दिला त्याचाच प्रचार पुढे नित्शेने केला.स्वातंत्र्य  ,समता व बंधुभावाची संस्थापना या जगात व्हावी असा त्यांचा हेतु नाही.ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व व चातुर्वर्णाची भलावण हे हिंदु आदर्श आहेत. हिंदुच्या चातुर्वर्ण्याच्या आदेशामधून जाती पध्दतीचा जन्म झाला.जन्मजात मुर्ख नसलेला माणुस चातुर्वर्ण्य  ही समाजरचनेची आदर्श पध्दती  आहे हे कसे मान्य करु शकेल ?

व्यक्ती विकासाच्या दृष्टीने  व समाजरचनेच्या दृष्टीने तो एक निखालस मुर्खपणा व गुन्हा आहे. हिंदु समाजरचनेवर अशापध्दतीचा घणाघाती हल्ला चढविल्यानंतर बाबासाहेब हिंदु तत्वज्ञानावर प्रहार करतात .वेदान्त, सांख्य, न्याय, वैशेषिक ही तत्वज्ञाने हिंदुधर्मात  काहीही बदल करु शकले नाहीत. त्यांना वरिल (विषमतावादी ) तत्वांना आव्हान देण्याचे कधीही र्धेर्य झाले नाही. ‘ सर्व वस्तु ब्रम्हरुप आहेत ’ हे हिंदू तत्वज्ञान केवळ बुध्दीगम्य विषय (बुध्दीचा खेळ)  होवून. राहिले ती कधीही सामाजिक तत्वज्ञाने (social philosophy ) बनु शकली नाहीत.या ठिकाणी बाबासाहेब तत्वज्ञानाकडे केवळ बौध्दीक करामतीचा विषय म्हणून पाहात नाही तर त्यांनी सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ,सामाजिक पुर्नरचनेसाठी हत्यारं पुरवावी या दृटिकोणातून पाहतात. तत्वज्ञाना संबंधाची अशीच भुमिका बाबासाहेब Riddles in Hinduism या ग्रंथात मांडतात “Philosophy is no(t a) purely theoretic matter. It has practical potentialities philosophy has its roots in the problem of life and whatever theories philosophy propound must return to society as instruments of reconstructing society” (Page No.178 Riddles in Hinduism - The Annotated  Critical selection –Navayana -2016)

यानंतर बाबासाहेब Annihilation  of caste मधील सुत्र Role of intellectual class बुध्दीजीवी वर्गाची भूमिका याआधारे पुन्हा चिकित्सा मांडतात कोणतीही संस्कृती तिच्या बुध्दीजीवी वर्गाच्या मार्गदर्शनावर व संगोपनावर अवलंबून असते येथे ती ब्राहमणी तत्वज्ञानावर अवलंबून हेाती. ब्राहमण हाच भारतातील बुध्दीजीवी वर्ग आहे.(“The intellectual class in India is simply another name for the Bramhin caste” Annihilation of Caste, page no.71 BAWS Vol.1 बुध्दीजिवी वर्ग  म्हणून बाबासाहेब देशभरातल्या ब्राहमणांच्या  अध:पतनाचे ,नैतिक पतनाचे अनेक पुरावे सादर करतात. आणि शेवटी निष्कर्ष देतात “ब्राह्मणांचे पोषण या सामाजिक देाषावरच होत होते. या साध्या कारणामुळे त्याने समाजातील प्रत्येक दोषाचे संरक्षण करण्यात आपली शक्ती वेचली.”

आधी राजकीय सत्ता ?

न्या रानडेंनी सुरु केलेल्या समाज सुधारणेच्या चळवळीला विरोध करण्यासाठी राजकारणी लोकांनी वैचारिक युक्तीवाद उभा केला. युक्तीवादानुसार सामाजिक सुधारणे आधी राजकीय सुधारणा झाली पाहिजे. (लो. टिळकांचे महाराष्ट्रात प्रसिध्द विधाने - भाकरी का करपली ?  घोडा का अडला ?)  यावर टिप्प्णी करताना बाबासाहेब म्हणतात न्या. तेलंग यांनी या राजकारणी लोकाच्या उपपत्तीचा पुरस्कार केला ती भुमिका अर्थातच तर्कसंगत होती परंतु तर्क म्हणजे शहाणपण नव्हे आणि पृथ:करण म्हणजे युक्तीवाद नव्हे हे ते विसरले पुढे बाबासाहेब म्हणतात सामाजिक सुधारणेच्या आधी राजकीय सुधारणा हा सिध्दांत टिकू शकत नाही हे मी दाखवून देणार आहे. प्रथम राजकीय सत्ता या मूददयाला बाबासाहेबांनी उत्तर दिले. (आम्हाला प्रत्येक माणसाला मुलभुत हक्क मिळवून घावयाचे आहे असे म्हणणा-यासाठी हक्क हे कायद्यापेक्षा समाजाच्या विवेक बुध्दीवरच अवलंबून असतात कायद्याने दिलेले हक्क मान्य करण्याची नैतिक प्रेरणा समाजापाशी असली तरच ते सुरक्षित राहतात. परंतु या मुलभुत हक्कांना समाजाचा विरोध असला तर कायदा विधिमंडळे ,न्यायालये  त्यांची हमी देवू शकत नाहीत. अमेरिकेतील निग्रो ,जर्मनीतील ज्यु आणि भारतातील अस्पृश्य यांना या कायद्याने दिलेल्या मुलभुत हक्कांचा उपयोग काय ?  जर एखादा माणसाने गुन्हा केला तर कायदा त्याला शिक्षा करु शकतो. पंरतु समाजातल्या मोठया गटाने  त्यांचे उल्लंघन करण्याचा चंग बांधला तर कायदा  काहीच करु शकत नाही. त्याचबरेाबर बाबासाहेब बर्कचे विधान देतात बहुसंख्य जनसमुहाला शिक्षा करण्याची कोणतीच तरतुद अजून सापडलेली नाही तसेच कोलरिज ला उदधृत करतात “–सामाजिक सदसदविवेकबुध्दी हा भ्रष्ट न होण्यासारखा –हदयापासून व खरा प्रशांत असा कायदा असून त्यांच्यापासून मुलभुत हक्कांचे किंवा प्रदान केलेल्या हक्कांचे संरक्षण करण्यास सर्व प्रकारच्या शक्ती केवळ मलमपटटीसारख्या ठरतात. याच युक्तिवादाला बाबासाहेब पुढे नेत स्वराज्य,सुराज्य,आणि लोकशाहीची चर्चा करतात .स्वराज्य सुराज्यपेक्षा श्रेष्ठ असते ही घोषणा  फसवी असल्याचे सांगून सामाजिक लोकशाही विना लोकशाहीची कल्पना करणे हास्यास्पद असल्याचे बाबासाहेब नमुद करतात .लोकशाही केवळ शासनाच्या प्रकार नसून ती समाज जीवनाची पध्दती आहे हे राजकारणवाद्यानी लक्षात घेतले नसल्याची तक्रार बाबासाहेब करतात (सामाजिक सुधारणा आणि सामाजिक लोकशाहीचे महत्व वर्तमान काळात अधिक वाढले आहे. रानडे आणि बाबासाहेबांच्या भुमिकेची कालसापेक्षता लक्षात घेतली पाहिजे!)

पक्षसंघटन विचारधारा बाबत बाबासाहेबांचे कालातीत चिंतन :-

न्या.रानडें च्या अनुषंगाने लिबरल पार्टीच्या –हासाची कारणमिंमासा मांडताना बाबासाहेबांनी केलेले चिंतन कालातीत आहे. “तुम्ही माणसांना ठार मारु शकाल परंतु भव्य विचारांना ठार मारु शकत नाही विचार अमर असतात” अशी धारणा असलेल्या मॅझिनीच्या या मताशी बाबासाहेब असहमती दर्शवितात.मनुष्य मर्त्य आहे त्याप्रमाणेच विचारही मर्त्य आहेत. अशी टिप्पणी करुन बाबासाहेब उदाहरण देतात की रोपटयांना ज्याप्रमाणे जगण्यासाठी पाणी देण्याची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे विचारांनाही प्रचाराचे पाणी घालणे आवश्यक असते. नाहीतर  दोन्हीही सुकुन मरुन जातात. विचार कितीही सशक्त आणि महान असले तरी त्याला जर प्रचारक नसतील तर ते विचार मरत असतात हे अतिशय महत्वाचे असे चिंतन बाबासाहेबांचे या ठिकाणी आलेले आहे.

याचपध्दतीने पक्षीय पातळीवरील संरचना व पक्षाची कार्यपध्दती यावरुन निर्माण होणारी संघटनशक्ती यावर भाष्य करताना बाबासाहेब पेन्डलीटन हॅरिंग यांच्या ‘पॉलिटिक्स ऑफ डेमोक्रेसी’ च्या आधारे पक्षाची कार्यप्रणाली स्पष्ट करतात. पक्षाचे संघटन एककेंद्रिय अशा तीन वर्तुळात पसरलेले असते आतील वर्तुळ पक्षसंघटनेतील जेष्ठ व्यक्तीचे असते यालाच उच्च अधिकारी (High commands ) असे म्हणतात यांच्याशी  सबंधित कार्यकर्ते  पक्ष संघटनेच्या  व्दारेच जीवननिर्वाह सुध्दा चालवीत असतात ते व्यावसायिक राजकारणी असतात आणि तेच पक्षयंत्रणेचे सुत्रधार असतात या दोन प्रकारच्या आंतरिक दलाना लागुनच (उच्च अधिकारी +कार्यकर्ते पूर्णवेळ ) पक्षाभोवती गर्दी करणा-या लोकांचे एक फार मोठे दुसरे वर्तुळ असते हे वर्तुळ परंपरागत भ्‍क्तीभावनेच्य व रुढीच्या रस्सीने पक्षाला बांधलेले असते पक्षव्दारा पुरस्कारित सिध्दांताचा हे लोक विचार करतात.पक्षाच्या तत्वप्रणालीला ते मते देतात या दुस-या वर्तुळाच्या बाहेर कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलेल्या जनतेचा  विशाल समुह असतो. हा वाहत जाणारा जनसमुह आहे हा समुह पक्षासाठी फार मोठे कार्यक्षेत्र आहे. हे लोक ध्येय हीन व विचारशुन्य  तरी असतात किंवा त्यांचे हितसंबंध एक विशेष्‌ प्रकारचे असल्यामुळे  ते कोणत्याही पक्षामध्ये सामील होत नाहीत. या लोकांना सिध्दांताशी व पक्षनीतीशी  काहीच कर्तव्य नसते तर जनहिताची कामे पूर्ण होण्यामध्ये त्यांची अभिरुची असते म्हणून कोणत्याही पक्षाला निरंतर या जनहिताच्या कार्यात व्यग्र  असावे लागते. आंबेडकरी व पुरोगामी पक्षसंघटनांना लागलेली  उतरती कळा पाहता त्याबाबतचा इशारा बाबासाहेबांनी लिबरल पार्टीच्या अनुष्ंगाने दिलेला आहे केवळ  विचारप्रणाली किंवा सिध्दांत जनतेला आकर्षित करु शकत नाही तर त्यासाठी हा निरंतर जनतेत असणारी व जनहिताची कामे करणारी यंत्रणा पक्षाकडे असणे गरजेचे असते हे बाबासाहेबांनी अधोरेखित केलेले आहे.

मी उदारमतवादी नाही (I am not liberal ):- भारतीय कम्युनिस्टाची /समाजवादयांची बुध्दी बाबासाहेब कसे Liberal  आहेत हे ठरवण्यात खर्च होते. परंतु या भाषणात बाबासाहेब  I am not liberal  हे ठणकावून सांगतात व पुढे भारतातील लिबरल  पार्टी संपली तर बरे होईल अशी भावनाही व्यक्त करतात. तेव्हा आता तरी बाबासाहेबांना उदारमतवादी चौकटीच्या बाहेर जावून अभ्यासण्याचा प्रयत्न या देशातील  विचारवंतानी करण्याची गरज आहे.(बाबासाहेबाना उदारमतवादी ठरवल्यामुळे सहस्त्र  इंगळया डसल्याची अनुभुती नामदेव ढसाळ यांना व्हायची. ‘आंबेडकरी चळवळ आणि सोशालीस्ट – कम्युनिस्ट ’,पान क्र.15, प्रभात प्रकाशन,मुंबई  )

गुरुशिष्य  पंरपरेवर भाष्य -:

महामानवाची  चर्चा करत असताना बाबासाहेब म्हणतात  कोणताही महामानव  आपली मते किंवा निर्णय आपल्या अनुयांयावर लादून व त्यांना बुध्दीभ्रष्ट  करुन आपले कार्य करीत नसतो. तर उलट तो त्यांना स्फुर्ती देतो त्यांना जागृत करतो. त्यांच्यात जोम निर्माण करतो आणि त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्यांना चालना देतो .पुढे बाबासाहेब लिहितात गुरुची मते व सिध्दांत शिष्याला बंधनकारक असतात असे समजून चालणे हे शिष्याच्या व गुरुच्या दृष्टीने चुकीचे आहे. शिष्याचे कर्तव्य तत्वे माहित करुन घेणे एवढेच आहे आणि त्याचे  महत्व व मुल्य त्यांला पटले तर त्याने त्याचा प्रसार करावयाचा असतो बुध्द व येशु ख्रिस्ताची हीच अपेक्षा असली पाहिजे असे बाबासाहेबांचे मत आहे.

वर्तमान भारत अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. विषमतेचे समर्थन करणा-या  विचारधारेची माणसे आज सत्तास्थानी आहेत, जागतिकीकरण ,बेरोजगारी ,जमिनदार – भांडवलदार सत्तास्थानी आहेत  ,आर्थिक दरी, संस्थात्मक शोषण व हिंसा,  ,जात – धर्मातील  मुलतत्ववाद्यांचा हैदोस आज आपणाला दिसत आहे.सामाजिक सुधारणा करु पाहणा-यांच्या मागे माणसे नसतात तर राजकीय सुधारकांकडे माणसांची गर्दी होते हे बाबासाहेंबाचे निरिक्षण आपणाला मर्यादित अर्थाने तृप्ती देसाई व कन्हैयाकुमार प्रकरणात पहावयास मिळाले आहे.

आपल्या देशात भविष्यात काय घडू शकते याची भविष्यवाणी(विचारवेध) बाबासाहेबांनी प्रेसिडंट रुझवेल्टच्या शब्दांत दिली आहे. ते म्हणतात प्रे. रुझवेल्ट यांनी जे मत अमेरिकेच्या  जनतेसमोर विचारार्थ मांडले होते ते मत आजपर्यंत येथे लागु झाले नसले तरी यापुढे येथेही ते लागु होईल.

“शासन कोण चालवणार –पैसा की माणुस? नेतृत्व कोण् करणार संपत्ती की बुध्दी? सार्वजनिक पदे कोण भुषविणार सुशिक्षित व देशप्रेमी लोक की संघटीत भांडवलदारांचे सेवक ? पुढे बाबासाहेब म्हणतात आजकाल भारतीय राजकारण विशेषत: हिंदु राजकारण सुव्यवस्थित होण्याऐवजी इतके व्यापारी झालेले आहे की त्याचेचे दुसरे नाव भ्रष्टाचार हे होवून बसलेले आहे. अनेक सज्जन माणसे या गटारगंगेत उतरण्याचे टाळत आहेत…….”

रानडे गांधी आणि जिना या भाषणाच्या  निमित्ताने बाबासाहेबांनी राष्ट्र ,समाज  व व्यक्ती  यावर अनेक तत्वचिंतकाच्या विचाराआधारे केलेले भाष्य पथप्रदर्शक असुन बाबासाहेबांच्या विविध भुमिकांचा, मतांचा  अभ्यास करण्यासाठीही हे भाषण महत्त्वाचे आहे.अनेक बाबी तपासण्यासाठीचे मानदंड(Standards) बाबासाहेब उभे करतांना दिसतात तसेच एखाद्या विषयाचे विश्लेषण कसे करावे ? याचे पध्दतीशास्त्रही आपणाला या भाषणात दिसते.

लेखक:सतीश बनसोडे

Tags:
share on:

Leave a Response